सध्याच्या बदलत्या युगामध्ये लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच हातात आपल्याला मोबाईल फोन (स्मार्टफोन) दिसून येतो.रोजच्या कार्यालयीन कामासाठी,तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी मोबाईल फोन महत्वाचा आहेच, पण त्याचा अतिवापर हा धोकादायक ठरू शकतो.
मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. मोबाईल फोनचा अती वापर केल्यामुळे शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात ते आपण खाली पाहू.
दृष्टी समस्या: दीर्घकाळ स्क्रीन पुढे बसल्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, डोळे कोरडे पडणे, दिसायला अंधुक येणे, हलके डोके दुखणे ही लक्षणे जाणवतात.
झोपेचा त्रास: संशोधनानुसार मोबाइल स्क्रीनद्वारे उत्सर्जित होणारा निळा प्रकाश मेलाटोनिनच्या(melatonin) उत्पादनात व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे झोप वेळेवर येत नाही आणि झोपेची गुणवत्ता खराब होते. मेलाटोनिन हा एक नैसर्गिक संप्रेरक(Hormone)आहे जो प्रामुख्याने मेंदूतील पिनियल ग्रंथीद्वारे(pineal gland)तयार होतो, झोपेच्या सायकलमध्ये या संप्रेरकाचा महत्त्वाचा वाटा आहे.
मान आणि पाठीच्या समस्या: दीर्घकाळापर्यंत मोबाईल फोनचा एकसारखा वापर केल्याने मान दुखू शकते, तसेच कमरेच्या समस्या देखील उद्भवतात.
व्यसनाधीनता आणि चिंता: मोबाईल फोनचा अतिवापर, विशेषत: सोशल मीडिया वर तासनतास बसणे, तसेच मनोरंजक आणि अश्लील व्हिडिओ पाहत राहणे, यामुळे चिंता (Anxiety)वाढू शकते, संशोधनानुसार जास्तीच्या स्क्रीन टाईममुळे आपले कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होत जाते,आणि मानसिक ताण देखील वाढतो. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे.
श्रवणशक्ती कमी होणे: हेडफोन्स किंवा इअरफोन्सचा जास्त आवाजात नियमित वापर केल्याने श्रवणशक्ती खराब होऊ शकते किंवा कालांतराने ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
रेडिएशन एक्सपोजर: मोबाईल फोनमध्ये सिग्नल ट्रान्समिशनसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीजचा(RF) वापर होतो, ज्यांची फ्रिक्वेन्सी अगदी कमी असते,त्यामुळे या रेडिएशन्सचा शरीरावर कॅन्सर सारखा गंभीर असा परिणाम होत नाही.काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की मोबाइल रेडिएशन्सच्या दीर्घकालीन संपर्कामुळे काही समस्यांचा धोका वाढू शकतो,जसे की डोकेदुखी,मानसिक आरोग्याशी संबंधित आजार.
फोकस आणि उत्पादकतेत व्यत्यय: मोबाइल डिव्हाइसवरील जास्त नोटिफिकेशनस् आणि मल्टीटास्किंगमुळे फोकस आणि उत्पादकता कमी होऊ शकते, विशेषत: कामाच्या वेळेस आणि अभ्यासाच्या वेळेस आपण हे अनुभवतो.
मोबाईल रेडिएशन्सचा आपल्या शरीरावर होणारा प्रभाव आपल्याला पूर्णतः टाळता तर येणार नाही पण कमी करता येऊ शकतो, मोबाईल फोन मधील रेडिएशनचा मेंदूवर होणारा परिणाम कमी होण्यासाठी मोबाईल फोन डायरेक्ट कानाला लावून बोलणे टाळा, स्पीकर मोड, हेडफोन किंवा इअर बडचा वापर करा. सिग्नल कमकुवत असताना कॉल करणे टाळा कारण यामुळे सेल फोन RF ट्रान्समिशन पॉवर वाढवतात. मोबाईल चार्ज होत असताना फोनवर बोलणे टाळा. या छोट्या छोट्या उपायांनी आपण शरीरावर होणारा रेडिएशनचा धोका तरी नक्कीच कमी करू शकतो.