चिंता विकार(Anxiety disorder) ही एक प्रकारची मानसिक आरोग्य स्थिती आहे. तुम्हाला चिंताग्रस्त विकार (Anxiety)असल्यास, तुम्ही काही गोष्टी आणि परिस्थितींना भीतीने घाबरून प्रतिसाद देऊ शकता. तुम्हाला चिंतेची शारीरिक चिन्हे देखील जाणवू शकतात, जसे की श्वासोस्वास वाढणे,धडधडणारे हृदय,घाम येणे, पोटात गोळा येणे.
काही चिंता सामान्य असतात जसे की तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी समस्या सोडवायची आहे, एखाद्या मुलाखतीला जायचे आहे,परीक्षेच्या दिवशी किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, अशाप्रसंगी तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता हे सामान्य आहे.
पण काही चिंता नेहमीच्या अस्वस्थतेच्या पलीकडे जातात, तुम्हाला वाटणारी थोडीशी भीती एक भीतीदायक अनुभव होऊन बसते तेव्हा आपल्याला चिंता विकार (Anxiety disorder)जडला आहे हे आपण ओळखावे.
चिंता तुमच्या कार्य करण्याच्या क्षमतेत व्यत्यय आणते.आपण आपल्या प्रतिसादांवर आपले नियंत्रण हरवून बसतो.
तुमच्या प्रतिक्रिया बऱ्याचदा परिस्थितीच्या प्रमाणाबाहेर होतात.चिंताग्रस्त विकारांमुळे समाजात जाणे कठीण होऊन बसते. सुदैवाने, या परिस्थितींसाठी अनेक प्रभावी उपचार आहेत, हे उपचार आपण पुढे बघूच पण त्याआधी आपण चिंता विकाराचे विविध प्रकार पाहू.
सामान्यकृत चिंता विकार (Generalized Anxiety Disorder (GAD)): घटना किंवा काही क्रियांबद्दल अत्याधिक चिंता आणि भीती वाटणे.
पॅनिक डिसऑर्डर(Panic Disorder):सततचा कामाचा ताण, अधिक प्रमाणात केले जाणारे कॉफीचे सेवन, तसेच इतर अनेक अँडीक्टिव गोष्टींमुळे पॅनिक अटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थिती मध्ये अचानक भीती वाटून येणे, श्वासोस्वास वाढणे,छातीत धडधडणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात.
सामाजिक चिंता विकार(social phobia):या चिंता प्रकारामध्ये व्यक्ती सामाजिक प्रसंगात जाणे टाळतो, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, आपण चार चौघात कसे वागू, कसे बोलू आपल्याला लोक नाव ठेवतील का? हाच विचार त्यांच्या मनामध्ये घोळत असतो.
विशिष्ट फोबिया(Specific Phobias):या विकारांमध्ये एखादी विशिष्ट वस्तू किंवा परिस्थितीबद्दल तीव्र भीती किंवा चिंता वाटते,जसे की उंचीची भीती, एखाद्या प्राण्याची भीती,उड्डाण किंवा बंदिस्त जागेची भीती, काळोखाची भीती.
ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर Obsessive-Compulsive Disorder (OCD):वारंवार येणारे, अवांछित विचार आणि त्याला प्रतिसाद म्हणून केली जाणारी क्रिया याला OCD म्हणतात. बऱ्याचदा या विकारांमध्ये येणारे विचार आणि केली जाणारी कृती यांचा काहीएक संबंध नसतो.
पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD):आपल्या सोबत झालेली एखादी घटना, प्रसंग, आपल्या संवेदन मनावर खोलवर प्रभाव करते, त्यामुळे त्या घटनेची आठवण येऊन आपल्याला तणावग्रस्त वाटते.
विभक्त चिंता विकार(Separation Anxiety Disorder):सामान्यपणे या विकाराचे लहान मुलांमध्ये जास्त निदान केले जाते, लहानपणी जेव्हा आई वडील मुलांना शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये सोडतात,तेव्हा येणारी घरच्यांची आठवण घरापासून लांब असण्याची फिलिंग त्यांना अस्वस्थ करते.तसेच एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यास किंवा तिचा देहांत झाल्यास, व्यक्ती या प्रकारच्या चिंता विकाराने ग्रस्त होतो.
विशिष्ट प्रकारच्या चिंता आणि व्यक्तीच्या गरजेनुसार वेगवेगळे उपचार केले जातात, काही सामान्य उपचार पद्धती आपण पाहू.
कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी(cognitive behavioral therapy):ही थेरपी चिंता विकारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी थेरपी आहे. या प्रकारच्या थेरपीमध्ये व्यक्तीचे निगेटिव्ह विचार लक्षात घेऊन त्यावर काम केले जाते.
औषधोपचार:या प्रकारच्या विकारांमध्ये अँटीडिप्रेसंट महत्वाची भूमिका बजावतात ,हे सामान्यता थेरपी सोबत देखील वापरले जातात.
जीवनशैलीतील बदल: नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापन केल्यास या विकारांपासून लवकर सुटका होण्यास मदत होते.दीर्घ श्वास, ध्यान, योगा, त्याचबरोबर स्वताची काळजी, स्वतासाठी वेळ काढणे, छंदांमध्ये गुंतणे हे सर्वांगीण कल्याणासाठी महत्त्वाचे आहे.
चिंताग्रस्त विकारांचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींनी चांगल्या उपचार पद्धती घेण्यासाठी लवकरात लवकर आरोग्यसेवा अधिकाऱ्याला भेट देणे नेहमीच फायदेशीर ठरते.